सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आलिशान फॉर्च्युनर कारला डुप्लिकेट नंबर प्लेट लावून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्याच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी ईश्वरसिंग रंजितसिंग राजपूत (सध्या रा. मन्द्रे, पेडणे गोवा, मूळ रा. राजस्थान) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी याकामी यशस्वी युक्तिवाद केला. 3 ऑक्टोबर रोजी सावंतवाडीत तालुक्यातील न्हावेली ते मळेवाड रस्त्यावर आलिशान फॉर्च्युनर कारमधून गोवा बनावटीची होणारी अवैध दारू वाहतूक एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने पकडली होती. याबाबत एलसीबी चे पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फॉर्च्युनर कारच्या नंबर प्लेट वरून अधिक तपास केला असता सदर नंबर प्लेट डुप्लिकेट असल्याचे उघड झाले होते. तसेच गुजरात पासिंग भासवणारी नंबर प्लेट सुद्धा कारमध्ये होती. या कारमधून 3 लाख 93 हजारांची अवैध दारू जप्त करण्यात आली होती व एकूण 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील 3 नंबर चा आरोपी ईश्वरसिंग राजपूत यानेच या फॉर्च्युनर कारमध्ये गोवा येथून दारू भरून दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी इश्वरसिंग ने दाखल केलेल्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पूढील मुद्दे मांडले. आरोपी ईश्वरसिंग याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असून जप्त प्रोव्ही माल मुंबई कळंबोली येथे हायवेवर डिलिव्हर केला जाणार होता, आरोपी गोवा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या आरटीओ डुप्लिकेट नंबर प्लेट वापरून प्रोव्ही माल गोवा राज्यातून महाराष्ट्र, गुजरात बॉर्डर क्रॉस करून राजस्थान राज्यात विक्रीसाठी नेत असल्याची शक्यता असून याबाबत आरोपी ईश्वरसिंगकडे माहिती आहे, या प्रोव्ही च्या मालाबाबत आर्थिक व्यवहार झाले आहेत, आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यात चोरी आणि घरफोडी च्या गुन्ह्यात हिस्ट्रीसीटर आहे, अर्जदार आरोपीविरोधात गोवा, गुजरात कर्नाटक राजस्थान राज्यात गुन्हे दाखल असण्याची शक्यता असून त्याचा तपास करायचा आहे, अर्जदार आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीचे आंतरराज्य रॅकेट चालवले असण्याची शक्यता असून या तपासासाठी आरोपी ईश्वरसिंग ची पोलीस कोठडी गरजेची आहे,आरोपी ईश्वरसिंग हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असून तो मूळ परराज्यातील रहिवासी आहे,जामीन मिळाल्यास पोलीस तपासात अडथळा येऊ शकतो, त्यामुळे त्याला जामीन मिळू नये. आदी मुद्दे मांडत सरकारी वकिलांनी घेतलेली हरकत ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.देशपांडे यांनी आरोपी ईश्वरसिंग राजपूत चा अटकपूर्व जामीन फेटाळला.












