गोपुरी जीवन शिक्षण शाळेत मुलांनी साधला निसर्ग संवाद

प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे यांचे मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी जीवन शिक्षण शाळेत रविवारी आयोजित केलेल्या “चला निसर्ग अनुभवूया” या विशेष सत्रात झाडे, वेली आणि सर्वांगीन निसर्ग मुलांसमोर अक्षरशः ‘बोलका’ झाला. प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी निसर्गाशी हितगुज साधत थक्क करणारा अनुभव घेतला.

ग.दि. माडगूळकरांनी गायलेल्या
“बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु…”
या ओळींचा प्रत्यय मुलांना प्रत्यक्ष निसर्गात फिरताना आला. गोपुरी आश्रम परिसरातील झाडे, वेली, पाने, खोड, मुळे यांच्या रंग, वास, पोत यांचे औत्सुक्याने निरीक्षण करताना गावडे सरांनी मुलांना झाडांचे औषधी उपयोग, स्थानिक-शास्त्रीय नावे आणि निसर्गातील परस्परसंबंध अत्यंत सोप्या व माध्यमिक शैलीत समजावून दिले.

एक झाड एका मानवाला आयुष्यभर देणाऱ्या ऑक्सिजनचा आर्थिक मूल्य साडेसात कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समजताच मुलांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
जंगलाशी मानवाचे नाळ जपण्याची गरज आणि निसर्ग संवर्धनाचे मूल्य मुलांच्या मनात सहज रुजवत किमान दहा वृक्ष लागवडीचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी मुलांना केले.

सत्राची सुरुवात मुलांच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी यावेळी प्रा. डॉ. गावडे यांचा अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चरित्रग्रंथाने सत्कार केला.

सलग साडेतीन तास सुरू राहिलेल्या या निसर्गसंवादात मुलांनी उत्सुकतेने भरपूर प्रश्न विचारले. पुस्तकाबाहेरचे ‘थेट निसर्गातील धडे’ अनुभवताना मुलांनी भरभरून शिकण्याचा आनंद घेतला. शेवटच्या टप्प्यात प्रकल्प अहवाल कसा लिहावा याबाबतही गावडे सरांनी मार्गदर्शन केले. “लहान मुलांना मार्गदर्शन करणे हा आमच्यासाठीही एक वेगळा आणि समृद्ध करणारा अनुभव ठरला. पुन्हा या शाळेत येऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या सत्रात काही पालकही पूर्ण वेळ उपस्थित होते. पालक प्रतिनिधी प्रा. योगेश महाडिक यांनी जीवन शिक्षण शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत मुलांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणाऱ्या या प्रयत्नाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप सावंत, विनायक सापळे, सदाशिव राणे व उमेश जाधव यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वांचे आभार मानून सत्राची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!