खारेपाटण (प्रतिनिधी) : तळेरे प्रभाग अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्रातील प्राथमिक शिक्षकांची संयुक्त शिक्षण परिषद शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी जि. प. प्राथमिक शाळा नडगीवे नं. २ या शाळेमध्ये केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
या शिक्षण परिषद कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, खारेपाटण जि. प. ल्ह केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, श्रीपाद बागडी, दशरथ शिंगारे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नडगीवे नं. २ च्या मुख्याध्यापिका पूजा शंकरदास आणि उपशिक्षिका रेश्मा होनगुंटे यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे व शिक्षक वृंदाचे स्वागत करण्यात आले. तर या संयुक्त शिक्षण परिषदेला दोन्ही केंद्रातील सुमारे ४० पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
परिषदेच्या सुरुवातीला केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांनी प्रास्ताविक सादर करून प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. शिल्पा बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना घडवताना ‘सकारात्मक शिस्त’ किती महत्त्वाची आहे या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले, तर शिक्षकांसाठीच्या विविध स्पर्धांबाबत सीमा वरुणकर यांनी सविस्तर माहिती दिली. संकलित मूल्यमापन १ (PAT-2) ची प्रक्रिया स्पष्ट करताना सोनाली मोरे यांनी विविध उदाहरणांचा वापर करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे, संदीप कदम यांनी काव्यात्मक शैलीचा वापर करत ‘निपुण महाराष्ट्र’ जिल्हा आणि राज्य अहवाल सादर केला, ज्यामुळे या परिषदेत एक वेगळी उत्साहवर्धकता निर्माण झाली.
नडगीवे नं. २ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि शिक्षक वृंद यांनी या परिषदेसाठी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्यामुळे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे ही शिक्षण परिषद यशस्वीरित्या पार पडली, त्याबद्दल केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.या परिषदेच्या सांगता प्रसंगी,पुढील संयुक्त शिक्षण परिषद ही ‘कुरंगवणे खैराट’ जि.प.
शाळेमध्ये आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.










