दोडामार्गात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा अपघात

कारचे किरकोळ नुकसान; सर्व प्रवासी सुखरूप

दोडामार्ग (प्रतिनिधी) : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे निघालेल्या पर्यटकांच्या कारचा दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब परिसरात आज सकाळी अपघात झाला. बेंगळुरू येथील हे पर्यटक काल रात्री बेळगाव येथे मुक्काम करून आज सकाळी दोडामार्ग मार्गे गोव्याच्या दिशेने रवाना झाले होते.

प्रवासादरम्यान कारमधील चार वर्षांची लहान मुलगी पुढील सीटवर बसलेल्या वडिलांकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे चालकाचे काही क्षण लक्ष विचलित झाले आणि त्याच दरम्यान कार रस्त्यावरून घसरत खाली घळणीत उतरली.

सुदैवाने, कार जवळील एका मोठ्या झाडाला धडकण्यापासून थोडक्यात बचावली. वाहनातील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मात्र अपघातात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठा अनर्थ टळल्याने परिसरात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!