कोकणी रानमाणसा सोबत मुलांनी अनुभवली निसर्गाशी नातं जोडणारी जीवनशाळा

तुळस येथे अनुभव शिक्षा केंद्रामार्फत तरुणांसाठी कौशल्य कार्यशाळा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, कोकण विभाग अंतर्गत एकदिवसीय कौशल्य कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी तुळस, वेंगुर्ला येथे कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या जीवनशाळेत करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध गावांतील व वेगवेगळ्या वयोगटांतील २५ तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात कृतिशील उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जीवनशाळेतील अंगण पूर्णपणे पाण्याने भिजवून त्यामध्ये मातीची एकरूपता साधण्यात आली. या उपक्रमात सहभागी सर्व तरुणांनी मोठ्या उत्साहाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. हा अनुभव तरुणांसाठी आगळा-वेगळा आणि अत्यंत मोलाचा ठरला. यानंतर सहभागी तरुणांसाठी विशेष कोकणी पाहुणचार करण्यात आला. पेज-भाजी असा पारंपरिक नाश्ता झाडांच्या पानांमध्ये वाढण्यात आला. पानात वाढलेल्या या भोजनाचा आस्वाद घेणे हा सहभागींसाठी खास आणि लक्षवेधी अनुभव ठरला. नाश्त्यानंतर सर्व तरुण जीवनशाळेत परतले.

यानंतर झालेल्या बैठक चर्चेत प्रसाद गावडे यांनी तरुणांना नैसर्गिक शेती आणि जंगलाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, कोकणाची जीवनशैली केवळ शेतीवर आधारित नसून जंगलही तितकेच महत्त्वाचे आहे. जंगलावर आधारित अन्नसाखळीमुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. पर्यावरणाला हानी न पोहोचवता शेती करणे ही कोकणवासीयांची खासियत आहे. नैसर्गिक शेतीत उत्पादनाचे प्रमाण जरी कमी असले तरी त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असते. रासायनिक प्रक्रियांशिवाय पिकवलेले अन्न आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरते. कोकणातील शेती टिकवायची असेल तर कोकणी खाद्यसंस्कृती जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आधुनिक तांत्रिक साधनांपेक्षा लोकांच्या श्रमदानातून केलेली शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत ठरते, असेही त्यांनी सांगितले. मातीची घरे, शेणाने सारवलेले अंगण, नैसर्गिक वनस्पती यांचा स्वीकार करत साधे, अर्थपूर्ण आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दुपारच्या सत्रात जेवणानंतर सहभागी तरुणांनी ‘मांघर फार्म स्टे’ला भेट दिली. येथे दुर्मिळ लाकूड आणि माती यांच्या संगमातून साकारलेली कौलारू घरे, तसेच माडांच्या झावळ्यांनी निर्माण झालेली नैसर्गिक सावली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी फार्म स्टेच्या अंगणात बसून प्रसाद गावडे आणि मांघर फार्म स्टे उभारण्यासाठी मेहनत घेतलेले बाळूदादा यांच्या उपस्थितीत तरुणांसोबत गटचर्चा झाली.

कार्यशाळेस मार्गदर्शन केलेल्या प्रसाद गावडे यांचे तसेच कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून एकदिवसीय कौशल्य कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!