शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक…!
दैनंदिन आरतीने उत्सवाची सांगता…!
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला. बाबांच्या समाधीस्थळी विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. यामुळे बाबांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती.दिवसभर धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलमुळे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. सर सायंकाळी कणकवली शहरातून भालचंद्र महाराजांची पालखी मिरवणूक पार पडली.पहाटे ५.३० वाजता काकड आरती व समाधीपूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. सकाळच्या आरतीला देखील भक्तांची मोठी गर्दी होती. या नंतर मंत्रोच्चार आणि हरिनामाच्या गजरात वातावरण मंगलमय झाले होते. सकाळी ११ वाजता समाधीस्थानी लघरुद्र व दुपारी आरती पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
दुपारी १ वाजता भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रात भजनांचा कार्यक्रम रंगला. वारकरी संप्रदायाच्या अभंगांनी परिसर दुमदुमून गेला.
सायंकाळी प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पालखीची ढोल ताशा तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक पटकीदेवी बाजारपेठ मार्गे तेली आळी, मुंबई गोवा हायवे मार्गे पुन्हा कणकवली बाजारपेठेतून भालचंद्र संस्थान येथे नेण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत वारकऱ्यांसोबतच भाविक भक्त सहभागी झाल्याने बाबांच्या जयघोषात कणकवली नगरी दुमदुमून गेली. या मिरवणुकीत बाबांचा देखावा देखील लक्षवेधी ठरला. यानंतर रात्रौ दैनंदिन आरतीने या उत्सवाची सांगता झाली.












