कणकवली (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ जीवदान समजले जाते. पाणी हे जीवन आहे याच पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्या माऊलीने रोवली होती. आई म्हणजे भूमी आणि माता तिला कधीच सोडू नका. मला देखील मातृभूमीची सेवा कर या माझ्या आईच्या एका वाक्याने मला पद्मश्री मिळवून दिला आहे. आपलं कोकण खूप समृद्ध आहे. येथील संस्कृती टिकवून कोकण अबाधित ठेवणे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. येथे शेतकरी कितीही संकटे आली तरी कधीचं आत्महत्या करत नाही. जीवनात नेहमी मोठी स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करा. प्रत्येक क्षेत्रात काम करतांना दुसऱ्यासाठी सतत काम करत रहा, एखाद्याला मदतीचा हात द्या असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांनी केले.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, एकदंत फूड अँड बेव्हरेजिस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सौ. शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच गडमठ गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते फीत कापून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्याचबरोबर कै. सौ. शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या प्रतिमेला शंतनु बांदिवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर पद्मश्री परशुराम गंगावणे, वैभववाडी पं.स.माजी सभापती बाप्पी मांजरेकर, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जि.प.सदस्य- संतोष पारकर, रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष- प्रकाश तेंडुलकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, गडमठ सरपंच- सौ.मालती शेटे, अस्तिरोग तज्ञ- डॉ.धनंजय रासम, दंतरोग तज्ञ- डॉ.स्वप्नील राणे, स्त्री रोग तज्ञ- डॉ.पोटे, तसेच नाक, कान, घसा तज्ञ- डॉ.करंबेळकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परिचारिका, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे बाप्पी मांजरेकर यांनी रक्तदान दानाचे महत्त्व विषद करून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी संघटनेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत संघटना कशाप्रकारे काम करते याविषयी माहिती दिली. याप्रसंगी कै. सौ. प्रभावती लक्ष्मण दवणे यांच्या स्मृतिपित्यर्थ लक्ष्मण दवणे (उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य) यांच्या सौजन्याने मानवाधिकार संरक्षण संघटना कोकण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने मानवाधिकार संघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या आरोग्य शिबिरांचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेतला तसेच तरुण वर्गाने ऐच्छिक रक्तदान केले.
















