मिरची महोत्सव मधून ग्राहकांना दर्जेदार मिरची उपलब्ध – विठ्ठल देसाई

कणकवली शेतकरी संघाच्या वतीने मिरची महोत्सव चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, कणकवली यांच्या वतीने सदस्य शेतकरी तसेच ग्राहकांना दर्जेदार मिरची रास्त दरात उपलब्ध व्हावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही “मिरची महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी संघाच्या समता बाजार कणकवली नं. १ च्या बाजूला या महोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे संचालक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच जिल्हा मजूर सहकारी संघाचे संचालक विठ्ठल दत्ताराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवात ग्राहकांसाठी सुपर बेडगी, बेडगी क्रमांक १, २, ३, किरण बेडगी, काश्मिरी, गुंटुर तसेच देठ काढलेली बेडगी अशा विविध प्रकारच्या उत्तम प्रतीच्या मिरच्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमात विठ्ठल देसाई यांची महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश मुकुंद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. संघाच्या या उपक्रमाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.

यावेळी संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक प्रशांत सावंत, विनिता बुचडे, संजय शिरसाट, स्मिता पावसकर, व्यवस्थापक डी. आर. परब, सहायक व्यवस्थापक राजेंद्र सावंत, लेखाप्रमुख सदिप तोरस्कर, खरेदी अधिकारी प्रशांत वाळवे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!