कणकवली उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवावे

कणकवली तालुका प्रवासी संघाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालील जागेचा वापर सध्या अनधिकृत पार्किंग आणि बेकायदा बाजारपेठेसाठी होत आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून पादचारी आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी तालुका प्रवासी संघ, कणकवली यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला निवेदनातून केली आहे.

तालुका प्रवासी संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात खारेपाटण, तळेरे, नांदगाव, कणकवली, कसाल, ओरोस बु. आणि कुडाळ अशा विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र, या पुलाखालील रिकाम्या जागेत सध्या स्थानिक व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चिकन शॉप आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी डेरा टाकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही जुने दुकानदार या जागा नवीन व्यापाऱ्यांना ‘डिपॉझिट’ आणि ‘भाडे’ तत्त्वावर देत असल्याची तक्रार प्रवासी संघाने केली आहे.

कणकवलीतील एस.एम. हायस्कूल ते छत्रपती शिवाजी चौक या परिसरात पुलाखाली मोठ्या प्रमाणावर ट्रक, टेम्पो, सहा आसनी रिक्षा आणि दुचाकींचे कायमस्वरूपी पार्किंग केले जात आहे. यामुळे पटवर्धन चौक सारख्या मध्यवर्ती ठिकाणी प्रचंड गर्दी आणि बकालपणा निर्माण झाला आहे. सेवामार्गावर (सर्व्हिस रोड) होणाऱ्या या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते.

पुलाखालील जागा ही मोकळी राहणे गरजेचे आहे. या जागेत बागा, शोभेची झाडे लावून सुशोभीकरण करणे अपेक्षित असताना तिथे अस्वच्छता पसरली आहे. पुलाचा भाग कोसळल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळेत दखल घेऊन हे अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव विलास चव्हाण, उपाध्यक्ष रमेश जोगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!