सर्व जबाबदाऱ्या पार पाडून उद्योजिका महिला देशासाठी आर्थिक योगदान देत आहे — नीता धुरी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील वाणिज्य विभागामार्फत “भारतीय महिला उद्योजिका” या समकालीन व प्रेरणादायी विषयावर भित्तिपत्रिकेचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनी काशी सावंत हिने प्रास्ताविक सादर केले. भारतीय महिला उद्योजिकांच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेत आजच्या काळात महिलांनी उद्योग, सेवा, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती प्रक्रिया, स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर तिने प्रकाश टाकला. यानंतर विद्यार्थिनी नीता धुरी हिने महिला उद्योजिकांच्या प्रेरणादायी व यशस्वी प्रवासाबाबत आपले विचार मांडले. सामाजिक बंधने, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांवर मात करत अनेक महिलांनी उद्योगक्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले असून त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे तिने सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योजकतेकडे वळून रोजगारनिर्मिती करावी आणि देशाच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव व प्रेरणा निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली पाटील यांनी केले, तर प्रा. पल्लवी साटम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












