औषधी वनस्पतींची जनजागृती– काळाची गरज ! – प्राचार्य डॉ. पुरंधर नारे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील भूगोल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘औषधी वनस्पती प्रमाणपत्र कोर्स’ आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व व त्याबाबत जनजागृती करण्यात आली.

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित केले. पश्चिम घाट हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असून येथे विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी आणि वनस्पती आढळतात. या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणीय संपदेच्या मान्यतेमुळे UNESCO कडून पश्चिम घाटाची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद करण्यात आली आहे. मात्र, या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, आपल्या सभोवतालच्या भौगोलिक प्रदेशातील संसाधनांची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी तसेच समाजहितासाठी उपयोगात आणली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रमाणपत्र कोर्समुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विविध बँकांच्या माध्यमातून कर्जसुविधा घेऊन औषधी वनस्पतींच्या आधारे उद्योग सुरू करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची मानसिकता जोपासली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

आजच्या धावत्या युगात समाजामध्ये विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. यावर परिणामकारक आणि नैसर्गिक उपाय म्हणून औषधी वनस्पतींचा मोठा आधार मिळू शकतो. विविध वनस्पतींपासून मिळणारी पाने, फुले, साल व बिया यांचा उपयोग करून अनेक कंपन्या औषधनिर्मिती करीत आहेत. आपल्या पूर्वजांनी पारंपरिक पद्धतीने औषधी वनस्पतींचा वापर विविध रोगांवर उपचारासाठी केला आहे, याची जाणीव आजच्या पिढीला असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेवटी प्रा. व्ही. व्ही. पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!