ग्रामपंचायत लोरे नं. 1 येथे शिवजयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत लोरे नं. 1 येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत लोरे नं. 1 येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अजय रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या शिवजन्मोत्सवाचे खास आकर्षण कोल्हापूर येथील मर्दानी खेळाने सुरुवात करून श्री देव रुजेश्वर उद्यान पर्यंत भव्य शिवरॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलचे विद्यार्थी विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

श्री देव रुजेश्वर उद्यान येथे कोल्हापूर येथील मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक पाहून सर्व उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फिटले. शोभा यात्रेमध्ये वेशभूषा करून सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलचे विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत लोरे नं. 1 येथे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हळदीकुंकूचे वाण म्हणून प्रत्येक महिलेला सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले. याबाबत सर्व महिलांनी सुपारी रोपांचे वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी मनोज रावराणे (जिल्हा परिषद सदस्य), तुळशीदास रावराणे, अजय रावराणे (सरपंच), रसिका रावराणे, नरेश गुरव, सुमन गुरव, सुनिल रावराणे, अनंत रावराणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!