करूळ घाटात इथेनॉलचा टँकर पलटी

मोठी दुर्घटना टळली; चालक गंभीर जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास क्रेनच्या साहाय्याने वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास घडला.

इथेनॉलने भरलेला टँकर (नं. एमएच 09 – एफएल – 7165) चालक नकाप्पा डोईफोडे घेऊन वारणा येथून गोव्याला जात होता. गगनबावडापासून काही अंतरावर करूळ घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर डोंगराकडील बाजूला गटारात पलटी झाला. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालकाचा पाय स्टेअरिंग खाली अडकला होता. चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी गगनबावडा व वैभववाडी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत होते. क्रेनच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले. टँकरमध्ये असलेल्या ज्वालाग्राही पदार्थामुळे दुर्घटना घडू नये, याची खबरदारी म्हणून फायर ब्रीगेडची गाडीही दाखल झाली होती. टँकर मधील इथेनॉल रस्त्यावर सांडले होते. याची माहिती करुळ चेक नाका येथील पोलिसांनी मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार संदीप कांबळे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस शिपाई संदीप राठोड आदी घटनास्थळी उपस्थित होते.

error: Content is protected !!