आरोपी मूळचा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा गावचा रहिवासी
कुडाळ (प्रतिनिधी): एलसीबी च्या पथकाने 2 किलो गांज्यासह रंगेहाथ पकडलेल्या कौस्तुभ चंद्रकांत देसाई ( वय 47, मूळ रा.भुईबावडा, रिंगेवाडी सध्या रा.उद्यमनगर कुडाळ ) याला कुडाळ न्यायाधीश पी आर ढोरे यांनी 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे वकील मेघा परब यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी कौस्तुभ चंद्रकांत देसाई याला एलसीबी च्या पथकाने 2 किलो गांज्यासह कुडाळ भैरववाडी येथील डॉन बॉस्को चर्च जवळील सुलभ शौचालयालागत 2 किलो गांज्यासह ताब्यात घेत अटक केली होती. ही कारवाई 1 मे रोजी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी करण्यात आली होती. याबाबत एलसीबी चे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.या गुन्ह्यात अधिक तपासकामी आरोपी कौस्तुभ चंद्रकांत देसाई याला आज कुडाळ न्यायालयात कुडाळ पोलिसांनी हजर केले. आरोपी चंद्रकांत देसाई याची पोलीस कोठडी मागताना सरकारी वकील मेघा परब यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.आरोपी देसाई याने सदर गांजा माल कोणाकडून खरेदी केला ? आणि तो कोणाला पुरवठा करणार होता ?, गांजा साठवणूक कुठे केली याचा तपास करणे, आरोपीचे अन्य साथीदार कोण आहेत ?, आरोपीचा अन्य गुन्ह्यात सहभाग आहे काय ?, गुन्ह्यात वापरलेल्या स्कुटरच्या मालकाचा शोध घेणे या कारणांसाठी पोलीस कोठडी ची मागणी करण्यात आली. सरकारी वकील मेघा परब यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कुडाळ न्यायाधीश ढोरे यांनी आरोपी कौस्तुभ चंद्रकांत देसाईला 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली.












