शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा प्रक्रियेला गती द्या

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (आंबिया बहार २०२५-२६) संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची गणना कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना पालकमंत्र्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. तसेच महसूल मंडळ पडेल, देवगड व फोंडाघाट येथील हवामान केंद्रे तांत्रिकदृष्ट्या अचूक ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करण्याचे निर्देश संबंधित स्कायमेट वेदर सर्विसेस, मुंबई यांना देण्यात आले. यामुळे पावसाचे व तापमानाचे अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पीक विमा योजनेचा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत वाढविण्याबाबत शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या. हवामानातील बदलामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, विम्याची रक्कम कोणत्याही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहू नये आणि ती वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!