ग्रा.प.सदस्य डाॅ.जितेंद्र केरकर यांचे जि.प.कार्यालया समोर बेमुदत उपोषण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मासिक सभेचे इतिवृत्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच नियमबाह्य कामकाज सुरू असल्याबाबत वारंवार तक्रार देऊन तसेच उपोषण करूनही संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या मालवण गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य डाॅक्टर जितेंद्र केरकर यांनी जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत मध्ये बे जबाबदार व नियमबाह्य कामकाज सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश तसेच शासन निर्णय यांचे पालन केले जात नाही. ग्रामपंचायत सदस्यांना विहित मासिक सभा झाल्यापासून आठ ते दहा दिवसात लेखी मागणी करूनही इतिवृत्त दिले जात नाही. इतिवृत्तासाठी पैसे भरना करण्याचे पत्र दिले जात आहे. वेळीच इतिवृत्त लिहिले जात नाही. अशी तक्रार तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य डॉ जितेंद्र केरकर यांची आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने, उपोषण केले आहे. ग्रामपंचायतीचे इतिवृत्त मिळवण्यासाठी उपोषण करावे लागत आहे. उपोषण केल्याशिवाय विद्यमान ग्रामपंचायत सदस्याला इतिवृत्त मिळत नाही ही शोकांतिका आहे. याबाबत मालवण गटविकास अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही यामध्ये सुधारणा होत नसल्याने आपण आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे असे डॉक्टर जितेंद्र केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मालवण तारकर्ली काळे थर ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य कामकाज सुरू असल्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही संबंधितांवर कारवाई होत नाही.त्याना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे तारकर्ली काळे थर ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मालवण गटविकास अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी. या मागणीसाठी आज डॉ जितेंद्र केळकर यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. तसेच ग्रामपंचायत मध्ये एसी लावण्याची सुविधा करण्यापेक्षा बायोमेट्रिक सुविधा व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून सुरू असलेल्या गैर कारभाराला आळा बसेल. अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली आहे.