खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत स्वदेश दर्शन योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एकूण देशातील ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होणार आहे.
गतवर्षी या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.त्याअंतर्गत जिल्ह्यातील सागरेश्वर, मिठबाव, तारकर्ली समुद्रकिनारी बीच टॉयलेट, वॉच टॉवर, रेस्टो, समुद्र किनारी गजोबो,आपत्कालीन परिस्थतीसाठी रेस्क्यू बोट, जेट स्की, हायमास्ट, बीच लाईट व अन्य कामे मार्गी लावण्यात आली आहेत.
यावर्षी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि योजना राबविण्यात येणार आहे.योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात निवती पोर्ट विकसित करणे, रिसॉर्ट उभारणे, बीच लाईट्स व जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक इतर विकास कामांसाठी ८० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.हा प्रस्ताव मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आहे.