विजयदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी आदी शत्रूंना नामोहरण करण्यासाठी मराठी आरमार एवढं सक्षम केलं की, भूदलातील त्यांचे यश समुद्रातील घडामोडींमध्ये सुद्धा आपल्याला ते भारी पडेल ही भीती शत्रूच्या मनात निर्माण केली. आरमार बांधताना महाराजांनी पोर्तुगीज कारागिरांची मदत घेतली. पण त्यांची कला आपल्या माणसांमार्फत आत्मसात करून आणि जहाज बांधणी करून मराठा आरमार सक्षम केलं. ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. या द्रष्ट्या नेतृत्वाचं अनुकरण करण्याची आज काळाची गरज आहे, असं प्रतिपादन शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी किल्ले विजयदुर्ग येथे केले.
निमित्त होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे. राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, विजयदुर्ग ग्रामस्थ आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी बलभीम मारूती मंदिरासमोर शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सौरभ करडे यांनी शिवरायांची तत्कालीन युद्धनीती, रयतेवरील प्रेम, व्यावसायिक दृष्टिकोन आदींबाबत विस्तृत ऊहापोह केला. यावेळी व्यासपीठावर विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, विद्याधर माळगावकर, आजाकाका धुळप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रणजीत हिर्लेकर यांनी कवीभूषण यांचे छत्रपतींच्या जीवनावरील छंद सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र परुळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. बापट यांनी केले. दरम्यान, छत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मारूती मंदिरामध्ये शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि दिवा बत्ती लावण्यात येणार आहे. हा उपक्रम विजयदुर्ग,रामेश्वर, गिर्ये गावातील ग्रामस्थ वर्षभर राबवणार आहेत.
दरम्यान, यानिमित्ताने मालवण येथील शालेय विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री याने शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली. त्याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने या विद्यार्थ्याचे कौतुक करताना सौरभ करडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सहसचिव यशपाल जैतापकर आदी उपस्थित होते. सौरभ करडे यांनी पार्थची कला बघून त्याला संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट म्हणून दिली. ती रांगोळी मारूती मंदिराजवळ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.













