तळेरे (प्रतिनिधी) : जागतिक तंबाखूविरोधी दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रज्ञांगण संस्था तळेरे येथे श्रावणी कंप्यूटर तळेरेच्या विद्यार्थ्यांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये व्यसन मुक्तीवर आधारीत पथनाट्य व सिडबॉल्स बनविणे असा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. तसेच या निमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर सचिव राजेश जाधव, राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, मोटिवेशनल लेक्चरर सदाशिव पांचाळ उद्योजिका सौ.राणे, कोकिसरे हायस्कूल च्या शिक्षिका – सौ तांबे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज चे प्राध्यापक हटकर,तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे च्या श्रावणी मदभावे, किर्ती आंबेरकर, प्रणाली मांजरेकर, स्मितेश पाष्टे , राहूल कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. समाजामध्ये ऐन तारुण्यात व्यसनाचे वाढते प्रमाण, व्यसनाच्या आहारी जाणारी तरुण पिढी, याचे गांभीर्य लक्षात घेऊन समाज प्रबोधन होणे फार आवश्यक आहे. पथनाट्य या या प्रभावी माध्यमातून श्रावणी कंप्यूटर्स तळेरे आणि मेधांश कंप्यूटर्स कासार्डे च्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. आणि तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारे सामाजिक नुकसान याची जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला. तसेच आताचे वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणातील नैसर्गिक घटकांचा -हास होत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, कमी होणारे पाण्याचे स्त्रोत ह्या खूप गंभीर बाबी आहेत आणि या साठी ठोस पावले नाही उचलली तर येणार्या पुढील पिढीला पर्यावरणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, आणि याच गांभीर्य लक्षात घेऊन तळेरे येथील निसर्ग मित्र परिवाराने जी सिडबँक ही संकल्पना सुरू केली आहे. या उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा म्हणून श्रावणी आणि मेधांश कंप्युटर च्या विद्यार्थ्यांनी स्वत: बिया जमा करून त्याचे सिडबॉल्स बनविले.
“व्यसन मुक्त रहा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा ” असे आवाहन श्रावणी कंप्युटर्स व मेधांश कंप्युटर्सच्या वतीने करण्यात आले.
प्रास्ताविक श्रावणी कंप्युटर्स च्या सतीश मदभावे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रावणी मदभावे यांनी केले.













