आत्महत्या कि घातपात याबाबत संभ्रम
कुडाळ पोलीसांकडून तपास सुरु
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरातील एका हॉटेलमध्ये आज मुंबईस्थीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र ही आत्महत्या कि घातपात याबाबत गुढ निर्माण झाले असून याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास कुडाळ पोलिसांनी सुरु केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि , कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ४० वर्षीय मुंबईस्थीत महिला मंगळवार दिनांक १३ जून पासून सदर हॉटेलच्या रुम नं. २०८ मध्ये राहत होती. तर लगतच्या रुम नं .२०९ मध्ये जिल्ह्यातीलच दोन युवक राहत होते. त्यातील एकजण कुडाळ तालुक्यातील होता. हे दोन्ही युवक त्या महिलेच्या संपर्कात होते , त्यातीलच एका युवकाने त्या महिलेच्या नावाने हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज शुक्रवारी ती महिला रुमचे दार उघडत नसल्याने त्या युवकांनी याबाबत हॉटेलच्या मॅनेजरला कळवले. त्यानंतर कुडाळ पोलीसांपर्यंत ही माहिती पोचताच कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रुम मध्ये फॅनला दोरीच्या साहाय्याने लटकलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान कुडाळ पोलीसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.











