आंबोली घाटात कोसळलेल्या इसमाचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या रेस्क्यू टीमचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः आंबोलीत पोहोचत केले कौतुक. 

कुडाळ (अमोल गोसावी) : आंबोली घाटामध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणापासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे २०० मीटर अंतरावर दीडशे फूट खोल दरीत अज्ञात पुरुषाचा देह असल्याची खबर मंगळवारी सायंकाळी काही स्थानिक लोकांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात दिली होती. पोलीस यंत्रणेने त्वरित आंबोली रेस्क्यू टीमला संपर्क करून ती व्यक्ती जिवंत असल्यास रेस्क्यू करण्यासाठी पाचारण केले. साडेसहाच्या सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व दीपक शिंदे आणि आंबोली आंबोली रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी जात पाहणी केली, त्यात ती व्यक्ती मृत असल्याचे लक्षात आले. दरम्यान धुके आणि अंधार यामुळे मृतदेह ताब्यात घेण्याची मोहीम बुधवारी सुरू करण्याचे ठरवले. 

ठरल्याप्रमाणे काल बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आंबोली रेस्क्यू टीमच्या मदतीने सदरचा मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्यासह आंबोली रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर व राकेश अमरुसकर यांनी दोरीच्या सहाय्याने दरीत उतरले. तर दीपक शिंदे, प्रथमेश गावडे, राजू राऊळ, मायकल डिसोजा, अमरेश गावडे, वैभव गावडे, विशाल बांदेकर तसेच रिक्षाचालक रमेश गुरव यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.

आंबोली घाटातील रेस्क्यू आणि रिकव्हरी प्रसंगी अनेकवेळा टीम आंबोली रेस्क्यू आणि बाबल अल्मेडा टीम आणि सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर या तीन टीम एकत्र येत जिल्ह्यातील रेस्क्यू प्रसंगात अग्रेसर असतात. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस निरीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्यापर्यंत पोहोचल्याने , या प्रसंगी रेस्क्यु टीमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात म्हणून बुधवारी दुपारी अकरा वाजता आंबोली येथे पोहोचले. यावेळी झालेल्या चर्चेत आंबोली रेस्क्यू टीमच्या मायकल डिसोझा आणि राकेश अमरुसकर यांनी टिमकडे असलेल्या दोऱ्या आणि काही अतिशय महत्वाची उपकरणे आता जुनी आणि जीर्ण झाली असल्याने काही नवीन उपकरणे न मिळाल्यास रेस्क्यू करणाऱ्यांचे अपघात घडू शकतात अशी खंत व्यक्त केली.

असे घडल्यास ही सेवाभावी मोहीम धोक्यात येईल आणि आपत्ती व्यवस्थापन हा विषय बदनामीच्या गर्तेत लोटली जाईल. तसे होऊ नये, तसेच आपत्कालीन प्रसंगी प्रवास करताना सुलभता यावी यासाठी ओळखपत्र मिळणेदेखील गरजेचे असल्याचे मत साहसवीरांनी पोलीस अधीक्षकांकडे व्यक्त केले. या बाबींची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आणि टीमच्या कामाबद्दल पाठीवर थाप मारत कौतुक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, हवालदार मुकुंद सावंत, हे. कॉ. दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, महेश निरवडेकर, पोलीस नाईक मनिष शिंदे, कॉ. अभिषेक कांबळे, यांच्यासोबत सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचरचे डॉ. कमलेश चव्हाण आणि बाबल अल्मेडा टीमचे प्रतीक मोहिते आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!