सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकाना नियुक्त करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. त्याऐवजी जिल्ह्यातील बेरोजगार डी एड पदवीधारक उमेदवारांना संधी द्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षाच्या वतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय पड़ते व सतीश सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात ११३० एवढी शिक्षक पदे रिक्त आहेत. तर १४० शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. या गंभीर स्थितीबाबत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते तर जिल्ह्यातील बेरोजगार डी एड उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात रिक्त जागांवर नियुक्ती द्यावी अशी मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाकडूनही या मागणीला सहमती दर्शविण्यात आली होती. मात्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परिपत्रक काढून सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय डी एड बेरोजगारांवर अन्याय करणारा आणि जिल्ह्यातील बेरोजगारी वाढवणारा आहे. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. तरी हा निर्णय तात्काळ रद्द करावा व रिक्त पदांवर डीएड बेरोजगारांना संधी द्यावी अशी मागणी आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा घेतलेला निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि डी एड बेरोजगारांना रिक्त पदांवर संधी द्यावी या मागणीसाठी १७ जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संजय पडते व सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी जिल्हा परिषद स्व निधीतून आरोग्य सेवक व अन्य विभागातील रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या दिलेल्या आहेत त्याच धर्तीवर डीएड उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी एखादी संस्था उभारून त्यामार्फत नियुक्ती द्यावी . मात्र कोणत्याही परिस्थितीत डी एड उमेदवार यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही प्रसंगी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
डी एड बेरोजगारांचा विचार करावा
सेवा निवृत्त शिक्षकानी जिल्ह्यातील डी एड उमेदवारांचा विचार करावा. त्याना संधी मिळावी या साठी नियुक्ती घेऊ नये.असे आवाहन यावेळी सतीश सावंत यांनी केले आहे.











