खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे परीक्षेचे उद्घाटन संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवली यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी करण्यात आले होते. या सराव परीक्षेचे उद्घाटन आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व परीक्षेचे केंद्रप्रमुख प्रदिप श्रावणकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षक पदाधिकारी मंगेश मुद्रस,राजू गर्जे, आशिष दुधे, सुनील तांबे, अमोल खोत यांसह प्रभा आकिवाटे, स्वाती झिर्ले, अमोल शिंदे, संजय राऊळ व अमोल भंडारी आदी शिक्षक उपस्थित होते.

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत खारेपाटण आणि शेर्पे या दोन केंद्रातील ७ शाळांनी सहभाग घेतला होता. तर एकूण २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा होणे काळाची गरज असून, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग करत असलेले कार्य हे निश्चितच उल्लेखनीय आहे. शिक्षक संघटना या विद्यार्थी केंद्रित ठेऊन शालेय कामकाजाबरोबरच सामाजिक कामामध्ये सक्रिय असतात व विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असल्याचे प्रतिपादन यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना केले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल खोत यांनी केले तर सर्वांचे आभार मंगेश मुद्रस यांनी मानले.












