राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठपुराव्यानंतर आरोपींना केले होते गजाआड
सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तर या प्रकरणात आणखी कोण आहे का, याबाबतचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पुढील माहिती देऊ, असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. संतोष विठ्ठल म्हालटकर (वय ४६) रा. बामणादेवी माडखोल, धोंडिबा उर्फ निलेश राजाराम नार्वेकर (वय ४२) रा. सांगेली अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकला होता. त्यानंतर त्यांना काल अटक करण्यात आली होती. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अधिक तपासणीसाठी त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आणखी काहीजण असल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस निरीक्षक श्री. अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या संदर्भात आमची चौकशी सुरू आहे. तपासी अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याबाबत तपास करीत आहेत. त्यामुळे उद्या याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर योग्य ती माहिती देऊ असे त्यांनी सांगितले.











