माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला
कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर नदी, नाले, ओढ्यांना देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस कोसळत होता. आज सायंकाळी पावसाने जोर धरल्यामुळे जिल्ह्यात सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात पडला असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगावमधील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पूलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तर कुडाळवरून माणगावला जाण्यासाठी झाराप-माणगाव या रस्त्यावरील साळगावमधील पूल देखील पाण्याखाली गेला आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला पूर आला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरून माणगाव खोऱ्यात जाण्यासाठी जाणाऱ्या झाराप माणगाव रस्त्यावरील देखील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे माणगाव खोऱ्यात पाणीच पाणी झाल्याची स्थिती सध्या सिंधुदुर्गात आहे.
कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान खात्याने दिली आहे.
कुडाळ शहरात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. रात्री ७ नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कुडाळ शहरात काळप नाका जवळ, गुलमोहोर हॉटेल यांच्या मागील बाजूस असणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला असून येथील जुन्या पुलाच्या काठोकाठ पाणी आहे.
कुडाळ शहरात आज तब्बल ५ ते ६ तास मुसळधार पाऊस झाला. यात कोणतीही हानी झाली नाही.











