माजी पं स सभापती प्रकाश सावंत यांचा टोला
वरवडे सह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राणेंमुळेच
कणकवली (प्रतिनिधी): वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत सुशांत नाईक यांनी भेट देत केलेले आरोप म्हणजे ‘आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पहावे वाकून’ यातला प्रकार आहे. वरवडे आरोग्य केंद्राच्या समस्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनीच सोडवल्या. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती आहे त्याला तुमचेच ठेकेदार जबाबदार आहेत. ही गळती कशी लागली ते त्यांनाच विचारा. कणकवली मतदार संघामध्ये फिरण्यापेक्षा सुशांत नाईक यांनी आपल्या आमदार भावाच्या मतदारसंघात फिरून एकदा आढावा घ्यावा म्हणजे कणकवली मतदारसंघातील स्थिती किती चांगली आहे हे त्यांना दिसेल.
वरवडे गावच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या सर्व समस्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीच सोडविल्या. सन 1990 पासून वरवडे गावातील सर्व समस्या त्यांनीच मार्गी लावल्या. सद्यस्थितीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांची जी कमतरता आहे त्याला जबाबदार तुमचे महाविकास आघाडीचेच सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात तुमच्याकडे सत्ता असताना जर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती केली असती तर आज तुमच्यावर अशी फिरण्याची वेळ आली नसती. गेल्या अडीच वर्षांमध्ये तुमचे मुख्यमंत्री जर घरातून बाहेर पडले असते तर आज तुम्हाला दारोदार फिरावे लागले नसते. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेला तुमचेच सरकार जबाबदार आहे. आता शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने भरती सुरू केलेली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या गळती बाबत बोलायचे तर तुमच्या सोबत असलेल्या या विभागातील ठेकेदाराकडे चौकशी करा. कारण ते काम त्यांनीच केले आहे. म्हणजे याबाबत डॉक्टर किंवा कर्मचारी सांगण्यापेक्षा तुमचे सहकारी त्याचे चांगले उत्तर देतील. कणकवली विधानसभा मतदारसंघातील समस्या तुम्ही निश्चितच जाणून घ्या पण एकदा तुमच्या आमदार भावाच्या मतदारसंघातील सर्व आरोग्य केंद्रांना जरूर भेटी द्या. या भेटीनंतर कणकवली मतदारसंघात आरोग्याची स्थिती किती चांगली आहे हे तुम्हाला दिसेल असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.












