कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत धुवाँधार पाऊस झाला. शहर आणि परिसरातही पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील प्रमुख १५ धरणांपैकी ७ धरणांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहर आणि परिसरात दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. सकाळपासूनच पाटगाव, कुंभी, तुळशी आदी धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारनंतर वाढलेला पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता.
घटप्रभा धरण परिसरात १४७ , तर पाटगांव परिसरात १४३ मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत ६७ , कडवीत ६५ , जांबरेत ६८ , कोदेत ९२ , तर चित्रीत ८८ मि.मी. पाऊस झाला. सकाळनंतरही जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला . पावसाचा जोर वाढल्याने धरणांत येणार्या पाण्याची आवकही वाढत आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. राधानगरी धरण मंगळवारी ५६ टक्के भरले.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ३९.२ मि.मी. इतका झाला. गगनबावड्यात ३२.१ मि.मी., भुदरगडमध्ये ३१.७ मि.मी., शाहूवाडीत २४.२ मि.मी., राधानगरीत २२.२ मि.मी., आजर्यात २०.३ मि.मी. पाऊस झाला. पन्हाळ्यात १८ .३ मि.मी., करवीरमध्ये १०.२ मि.मी., कागलमध्ये १० , तर गडहिंग्लजमध्ये १०.१ मि.मी. पाऊस झाला. हातकणंगलेत ५.२ , तर शिरोळमध्ये २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.












