मावळते जिल्हाध्यक्ष व विधानसभा प्रभारी राजन तेली यांनाही मंत्री महोदयांनी केले सन्मानित
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यामध्ये आलेले प्रभाकर सावंत यांचा सत्कार केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्याच्या संघटनात्मक दौर्यावर असलेले केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा हे बुथ ची बैठक घेण्यासाठी परबवाडा येथे आले होते, यावेळी भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी चार वर्षे धुरा सांभाळणारे माजी आमदार राजन तेली यांचाही सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले कि,आजच माझी नियुक्ती झाली आणि पहिलं स्वागत आणि सत्कार एका बुथवर होत आहे ही माझ्या आणि संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि कार्यपद्धती ही खूप वेगळी आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांने जिल्हाध्यक्षपदी विराजमान होणे हे फक्त भाजपा संघटनेतच वास्तवात येऊ शकते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना युवा मोर्चा पासून जिल्हा संघटन सरचिटणीस पदापर्यंत पक्षनिष्ठ,संघटना शरण वृत्तीने आणि संयम बाळगत काम केल्यामुळे पक्षाने दखल घेऊन जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपावलेली आहे.पक्षाचं इतकं मोठं काम अजून विस्तारण्याचे आव्हान समोर आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राखत, त्याच्या सुखदुःखात समरस होत भविष्यात सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. आपल्या संघटनेत पक्षकार्य सुरू असताना आपण करत असलेल्या कामाचे मूल्यमापन एक वेगळ्या नजरेने होत असते, योग्य कार्यकर्त्यांला योग्य वेळी संधी देण्याचा प्रयत्न आपली वरिष्ठ मंडळी करत असतात. अश्या पद्धतीने काम केल्याने 2 खासदारांची संख्या 300 च्या वर गेली, भविष्यात ती 400 होईल.या सत्कार प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा प्रवास योजनेचे सहसंयोजक प्रमोद जठार, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक, सरपंच संघटना अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, महीला मोर्चाच्या सारीका काळसेकर, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर – हेमंत गावडे – संतोष सावंत, ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथ अध्यक्ष बाळा मळगांवकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.