आगामी वर्षात 3 हजार काेटी ठेवींचे उद्दीष्ठ व 6 हजार काेटी उलाढाल करण्याचा संकल्प
ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. शेती,पशु संवर्धन, फलोद्यान,मत्स्य,नवउद्योजक,महिला ज्येष्ठ नागरिक या घटकांना पाठबळ देणारी जिल्हा वासियांची ही बँक आहे.म्हणूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत डिजिटल बँकेच्या माध्यमातून बँकिंग सेवा गतिमान करण्याचा निर्णय चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतानाच आगामी वर्षात 3000 कोटीच्या ठेवींचे उद्दिष्ट व 6000 कोटीची उलाढाल हा संकल्प जाहीर करण्यात आला,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी वार्षिक सभा संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे संपन्न झाली.सभेनंतर बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,संचालक व्हिकटर डॉन्टस,गजानन गावडे, प्रकाश मोर्ये,नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर,समीर सावंत, विद्याधर परब, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, एडवोकेट प्रकाश बोडस, महेश सारंग, सुशांत नाईक आदी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे सभेला उपस्थित होते. यावेळी १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या १२६ संस्थांचा सत्कार करण्यात आला.












