शासनाच्या योजनांची माहिती पुस्तिका तयार करुन ती तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. महेंद्र कल्याणकर

मंडळ स्तरापर्यंत 3 हजार 760 विविध दाखल्यांचे वितरण -जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महसूल विभाग शासनाचा महत्वाचा विभाग असून या विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यापर्यंत जाण्यासाठी योजनांची माहिती असणारी पुस्तिका तयार करुन ती महसूल दूतांच्यामार्फत तळागाळापर्यंत पोहोचवावी. तसेच यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनीही आपला सहभाग द्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.

महसूल सप्ताहानिमित्त नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, तसेच विविध लाभार्थींना लाभ प्रदान करणे या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रशिक्षणार्थी आयएएस करीष्मा नायर, विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.

डॉ. कल्याणकर म्हणाले, कोकण महसूल विभाग वैविध्यतेने भरलेला आहे. महसूल विभाग शासनाच्या नियमानुसार अहोरात्र विविध कामे करणारा विभाग आहे. बदलत जाणाऱ्या परिस्थितीनुसार अद्ययावतपणे व अव्याहत काम या विभागात केले जाते. कमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडविल्या जातात असे सांगून ते पुढे म्हणाले, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला आहे. या माध्यमातून अनेकांना लाभ देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता महसूल सप्ताहाचे आयोजन करुन जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महसूल सप्ताहात सिंधुदुर्ग जिल्ह्याने उत्कृष्ठ काम केले आहे. सप्ताहाच्या समाप्तीनंतरही हे काम गतीने सुरु ठेवून गरजवंताना तात्काळ दाखले देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना वंचितापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करत रहावे. महसूल सप्ताहामध्ये महसूल दूत व महिला सक्षमीकरण करण्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याने अधिक भर दिला आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. सुनियोजितपणे व टीमवर्कने सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलेले काम प्रशंसनिय असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यावेळी म्हणाल्या, महसूल विभागाने मंडळ स्तरापर्यंत जावून जिल्ह्यात सुमारे 3 हजार 760 विविध दाखल्यांचे वितरण केले आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात जावून घरोघरी दाखले वाटप केले आहेत. एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत कातकरी समाजाला दाखले देण्याबरोबरच बँक खाते काढून दिले आहे. सलोखा योजना, ई-पीक पाहणी यामध्ये जिल्ह्यात अत्यंत चांगले काम केले आहे. त्याचबरोबर आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ई-ऑफीस योजना सुरु करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात यश येत आहे. याही पुढील काळात महसूल विभागाचे अधिक सक्षमीकरण करुन शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातीत, असे आश्वासन देवून महसूल सप्ताहाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दि. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या व येणाऱ्या विविध उपक्रमांची व कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महसूल विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. व सह दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देवून कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. तसेच निवृत्तीवेतन लाभ, सलोखा योजना लाभ, लक्ष्मीमुक्ती योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई लाभार्थी, धनादेश वितरण, कातकरी समाजाला दाखले व शिधापत्रिका वितरण, विशेष शिधापत्रिका वितरण, कौटुंबिक शिधापत्रिका वितरण, प्रकल्पग्रस्तांना भुखंड वाटप प्रमाणपत्र तसेच कृषि विभागाच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले. तर आभार अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी मानले. याप्रसंगी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, लाभार्थीं उपस्थित होते.

error: Content is protected !!