विधवा ,परितक्त्या महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेणारी जिल्ह्यातील घोणसरी पहिली ग्रा.पं.
5 फेब्रुवारी रोजी महिला सांस्कृतिक मेळावा, हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विधवा, परितक्त्या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करणारी कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत ही पहिली ठरली आहे. घोणसरी ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावातील विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी 5 फेब्रुवारी रोजी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यशासनाने राज्यात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुका हा विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामपंचायत च्या माध्यमातून ठराव घेणारा पहिला तालुका ठरला. पुरोगामी सिंधुदुर्ग जिह्याची ओळख अधोरेखित करतानाच याच दिशेने एक पाऊल पूढे टाकत घोणसरी गावचे सरपंच मॅक्सि पिंटो, उपसरपंच दिप्ती कारेकर, सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामसेवक सिद्धेश गोसावी यांनी एकमताने गावातील विधवा तसेच परितक्त्या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता घोणसरी ग्रामपंचायत च्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच मॅक्सि पिंटो यांनी केले आहे.













