” त्या ” 10 प्रश्नाची पत्रक वाटप ठरतेय जनतेचे लक्षवेधी
खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करणाऱ्या होऊ द्या चर्चा या शिवसेना उबाठा च्या कार्यक्रर्माच्या धर्तीवर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवर आमदार नितेश राणेनाही 10 प्रश्न विचारले. याच 10 प्रश्नांची पत्रके खारेपाटण बाजारपेठेत प्रत्येक दुकानात आणि नागरिकांपर्यंत पोचवून युवासेनेने एक प्रकारे जन की बात छेडल्याची प्रतिक्रिया पत्रक वाचल्यानंतर नागरिकांतून व्यक्त होत होती. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर , उपविभागप्रमुख शिवाजी राऊत , दिगंबर गुरव, गिरीश पाटणकर, संतोष गाठे , भारतभूषण, युवा सेनेचे चंद्रकांत शेटये ,अनंतराव गांधी ,सुनिल कर्ले ,प्रकाश नानिवडेकर, अक्षय चिके, विलास करंगुटकर आदि उपस्थित होते.विशेषतः आरोग्याचा प्रश्न, प्राथमिक, उपजिल्हा आणि तालुकास्तरावर ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्स चा अपुरा स्टाफमुळे नागरिकांना होणारा त्रास, मुस्लिम समाजविरोधात हिंदू मुस्लिम दुही माजवणारी चिथावणीखोर वक्तव्ये आदी प्रश्नांवरून आमदार नितेश राणेंच्या विरोधात रान उठवणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी 5 ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते. त्याची प्रचिती 6 ऑक्टोबर रोजी कणकवलीत झालेल्या होऊ द्या चर्चा , विचारा प्रश्न या कार्यक्रमावेळी लावलेल्या बॅनर मधून आली होती.जनतेला भूलथापा मारून दिलेल्या पोकळ आश्वासनांचे काय झाले या बाबत च्या 10 प्रश्नांची प्रसिद्धीपत्रके संपूर्ण कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात जनतेत जाऊन जनतेच्या हातात वाटप करणार असल्याचेही नाईक म्हणाले होते.त्यानुसार सुशांत नाईक यांनी खारेपाटण बाजारपेठ येथे जाऊन आ. नितेश राणेंना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकांचे वाटप केले.