ओरोस (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात कंत्राटी भरतीचा आदेश काढला असताना तो आदेश रद्द करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप करीत असल्याने हा निषेध नोंदविण्यात आल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, सुप्रिया वालावलकर, पांडू मालवणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महा विकास आघाडीचा निषेध केला. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा व्यक्तिगत सुद्धा निषेध केला. यावेळी बोलताना अतुल काळसेकर यांनी, महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार यांच्या आशीर्वादाने कंत्राटी शासकीय कर्मचारी भरतीचा आदेश मंजूर केला होता. यासाठी दोन खाजगी कंपन्या नियुक्त केल्या होत्या. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे ठाकरे व पवार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहे. हा आदेश रद्द केल्याने राज्यातील युवकांना कंत्राटी नाहीतर कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. हा राज्याच्या हिताचा निर्णय आहे, असे स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओरोस फाटा येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जाहीर निषेध












