जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती
तळेरे (प्रतिनिधी): तळेरे ते गगनबावडा या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २५० कोटी रुपये मंजूर झालेले होते. या कामाची ०१/१२/२०२२ रोजी निविदा प्रक्रिया होऊनही अद्याप काम सुरू झालेले नाही. तसेच रस्त्यावरील खड्डे देखील बुजविले गेले नाहीत. २१ किमीचा हा रस्ता असून भवानी कन्ट्रक्शन कोल्हापूर यांना या कामाचा ठेका मिळाला आहे. १८ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण करावयाचे आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असताना देखील केंद्र व राज्य शासन निद्रिस्त आहे. त्यांना जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी गगनबावडा हद्दीपासून करूळ वैभववाडी ते तळेरेपर्यंत २१ कि. मी. पदयात्रा काढून पाहणीदौरा करण्यात येणार आहे याला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे. काँग्रेस कार्यकर्ते या शासनाला जाग आणण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतील असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी २५० कोटी रुपये मंजूर झालेले होते. त्यानुसार निविदा प्रक्रियाही झाली. दोन लेनच्या या रस्त्यासाठी भवानी कन्स्ट्रक्शन यांनी ४० टक्के बीलोने ११० कोटीला टेंडर भरले व मंजूर झाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये निविदा मंजूर होऊनही आद्यप काम सुरू झालेले नाही.या दोन लेनच्या रस्त्यासाठी १६३ हेक्टर जमीन संपादनाची गरज असून त्यातील ९६ टक्के जमीन संपादित आहे. त्यामुळे काम सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही. पाऊस कमी झाल्यावर काम सुरू करतो, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले होते. मात्र अजूनही काम सूरू केलेले नाही तसेच रस्त्यावरील खड्डेही भरलेले नाहीत त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून नियमित वाहतुकीसोबत चिरे, ऊस, सिलिका व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.