कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या ‘ये गs ये गss सरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन….!

 कवी केशवसुतांच्या पुण्यतिथी दिनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे प्रकाशन

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेतील २५ कवींचा कवितासंग्रह कविकुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. सदर प्रकाशन सोहळा बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दुपारी ठीक ३:३० वाजता सुरू होणार आहे.

ये गs ये गss सरी या कवितासंग्रहातील कविता कोमसाप मालवणच्या बावीस उदयोन्मुख कवींनी लिहिल्या असून त्यात रुजारिओ पिंटो, सुनंदा कांबळे, एकनाथ गायकवाड या तिघा प्रतिथयश कवींच्या कवितांचा समावेश आहे. प्रत्येक कवीच्या प्रत्येकी सहा कविता या कवितसंग्रहात असून एकूण १५० कवितांचा हा देखणा कवितासंग्रह सत्त्वश्री प्रकाशन, रत्नागिरी यांनी प्रकाशित केला असून त्या कवितासंग्रहाचे संपादन सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष – कोमसाप मालवण यांनी केले आहे. श्री. माधवराव गावकर यांची या कवितासंग्रहाला अभ्यासू प्रस्तावना लाभली आहे.

कोमसाप मालवणने यापूर्वी सिंधुसाहित्यसरिता, बीज अंकुरे अंकुरे ही अनुक्रमे चरित्रात्मक आणि ललित साहित्याची पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांना मराठी वाचक वर्गाचा प्रतिसादही बऱ्यापैकी लाभला आहे. सदर पुस्तक कोकण मराठी साहित्य परिषदेचे तीर्थक्षेत्र आणि कवी केशवसुतांचे जन्मगाव मालगुंड या गावाला आणि तेथील केशवसुतांच्या स्मारकाला अर्पण करण्यात आले आहे. कवी केशवसुतांच्या स्मारकाला; कवितेच्या राजधानीला अर्पण होणारा हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह आहे. कवितांचा शुभारंभ डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या ‘अक्षरांची आरतीने’ झालेला आहे.

सदर कवितासंग्रहाला शुभेच्छा देताना श्रीमती नमिता कीर, (केंद्रीय अध्यक्ष कोमसाप) म्हणाल्या, “मालवण कोमसापचे २५ कवी आत्मविश्वासाने कविता लेखनाचे पहिले पाऊल उचलित आहेत आणि आपला कवितासंग्रह प्रकाशित करीत आहेत, याचे मला कौतुक आहे. आणि सार्थ अभिमानही आहे. लिहित्या हातांना सदैव प्रोत्साहन देण्याचा आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांचा वसा मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर श्रद्धेने पुढे नेत आहेत. श्री. ठाकूर आणि आत्मविश्वासाने कविता लेखनाचे पहिले पाऊल उचलणाऱ्या उदयोन्मुख कवींना माझ्या शुभेच्छा!”

सदर प्रकाशन सोहळा मंगेश मसके (अध्यक्ष कोमसाप सिंधुदुर्ग) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत असून प्रमुख मान्यवर म्हणून श्रीम. नमिता कीर, (केंद्रीय अध्यक्ष कोमसाप), अनिकेत कोनकर (प्रकाशक, सत्त्वश्री प्रकाशन), माधवराव गावकर, सुरेश ठाकूर (संपादक) आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी “सर आली धावून” हा काव्यवाचन कार्यक्रम होणार आहे.

तरी सदर सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांचे वतीने देण्यात आले आहे. सदर अक्षर सोहळ्याला सर्व काव्यसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, (निमंत्रक- प्रकाशन सोहळा तथा उपाध्यक्ष कोमसाप मालवण) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!