आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांची माहिती
दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केली असून पुढील दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे प्राप्त होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई रक्कम जमा होईल असे लेखी पत्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक विजयकुमार राऊत यांनी देत आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तसेच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुढील आठ दिवस पीक विमा आंदोलनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कृषी अधीक्षकांनी दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असे आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आंबा व काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांनी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी विजयकुमार राउत यांनी आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केल्याचे सांगितले. पुढील दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे प्राप्त होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा होईल असे लेखी पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तसेच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुढील आठ दिवस पीक विमा आंदोलनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कृषी अधीक्षकांनी दिलेल्या कालावधीत शेतकऱयांना विमा रक्कम न मिळाल्यास त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असे आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आल्या असल्याने त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि संबंधित शेतकऱ्यांसमवेत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक ०६ नोव्हेंबर २०२३ दुपारी ३ वाजता राज्याच्या कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेतेखाली त्यांचे दालन क्र. ५०९ पाचवा मजला मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.