आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील जागृत देवस्थान श्री जयंत देवी रवळनाथ पंचायतन देवस्थानचा डाळपस्वारी उत्सव 5 जानेवारी पासून सुरु होत असून शुक्रवार 5 जानेवारी रोजी दुपारी भोजन प्रसादानंतर देवी देवतांना गाऱ्हाणं करून दुपारी तीन वाजता देवाचे तरंग ब्राह्मण देवाच्या भेटीला जाणार असून त्यानंतर पंचायतन देवस्थान मध्ये श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई व श्री देव गांगेश्वर यांची भेट घेऊन सायंकाळी तरंग श्री रवळनाथ मंदिरात स्थिर होणार आहेत.
शनिवार 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता रवळनाथ पावणाई मंदिराची तळी स्वीकारून तिथून पुढे शेतशिवारा या ठिकाणी देवाची भेट घेण्यासाठी जाणार असून. या ठिकाणी निरोप घेऊन वाटेत येणाऱ्या भक्तांच्या तळी घेऊन देवाचे तरंग डिग्गीवाडी येथे जातील. त्यानंतर डिगीवाडीहून परतून दुपारी डॉक्टर भोगटे यांचे घरी महाप्रसाद व श्री देव नवगिरा आणि श्री देव भूतोबा यांची भेट घेऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वरचीवाडी या मंदिरात येतील. तेथील वाडीच्या लोकांच्या तळ्या घेऊन प्रजेच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन श्री देव सत्तावीस स्थळ या ठिकाणी संध्याकाळी येणार असून. त्यानंतर वाटमार्गाने प्रस्थान करत श्री ब्राह्मण देव वायंगणकरवाडी आणि श्रीदेव शेंबेकर यांची भेट घेऊन खालचीवाडी येथे श्री देवी पावणाई मंदिरात रात्री विश्रांतीसाठी येणार आहेत. हे मंदिर पावणाई देवीचे माहेर आहे अशी आख्यायिका आहे.
रविवार 7 जानेवारी रोजी खालच्या वाडीतील भक्तांच्या तळ्या घेऊन आणि देवीचा निरोप घेऊन तरंग श्री देव महापुरुष आपकरवाडी येथून भक्तांच्या तळ्या घेऊन आणि देवाचा निरोप घेऊन वाटेत येणाऱ्या भक्तांच्या तळ्या घेत गावठाणवाडीमध्ये प्रवेश करतील. दुपारी वाडीतील भक्तांच्या घरी भेटी देऊन तसेच बारा पाच मानकरी यांच्या घरच्या आकाराची भेट घेऊन रात्री श्री जयंती देवी मंदिरात विसावतील.
सोमवार 8 जानेवारी रोजी सकाळी श्री जयंती देवी मंदिरा समाराधना होऊन महाप्रसादानंतर दुपारी सौंडाळाचा न्याय होऊन आलेल्या भक्तांचे प्रश्न अडीअडचणींवर मार्गदर्शन करून देवाचे तरंग विसावतील.अशा स्वरूपात वार्षिक डाळप स्वारी होणार असून सर्वाभाविक भक्तांनी डाळपस्वारीला उपस्थिती त राहावे असेल आवाहन श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब यांनी केले आहे.