आचरा (प्रतिनिधी) : आचरा भंडारवाडी येथे दोन महिला चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून सुवर्ता राघू शिंदे वय 48 रा जामसंडे शिळोम व चांगुणा देवप्पा काळे वय 30 राहणार जामसंडे यांना आचरा पोलिसांनी मालवण तहसिलदार यांच्या समोर हजर केले असता त्यांच्यावर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदरील दोन महिला या आचरा भंडारवाडी येथील मांजरेकर यांच्या बंद घराच्या मागे सोमवार पाच फेब्रुवारी ला फिरत होत्या त्यांच्या हालचाली संशयित असल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता यांनी विसंगत माहिती देण्यास सुरवात केली होती. सदर महिला या बौद्धवाडी, देऊळवाडी व पारवाडी येथेही फिरत असल्याचे समोर आले होते. आचरा भंडावाडी येथील ग्रामस्थ दीप्ती नाईक व वैशाली आचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात त्या संशयित फिरणाऱ्या महिलांवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यासाठी तक्रार दिल्यावरून आचरा पोलिसांनी त्या महिलांची चौकशी करत त्यांना मालवण तहसीलदारां समोर हजर केले असता प्रतिबंधत्मक कारवाई केली गेली. सदर तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुदेश तांबे करत आहेत.












