फोंडाघाट मध्ये जीर्ण लोखंडी विद्युत पोल आणि भारांकित विद्युत तारा देताहेत अपघाताला निमंत्रण

तात्काळ उपाययोजना न केल्यास छेडणार आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते भाई हळदीवे यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील जीर्ण झालेले लोखंडी विद्युत पोल आणि भारांकित जीर्ण विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना जाऊन वित्त आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र उर्फ भाई हळदीवे यांनी विजवीतरण कंपनी चे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास स्थानिक ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशाराही भाई हळदीवे यांनी दिला आहे. निवेदनात भाई हळदीवे यांनी म्हटले आहे की, फोंडाघाट गावात असलेल्या विद्युत वाहिन्यांचे खांब हे बऱ्याच ठिकाणी जीर्ण झालेले, तळाला गंजून मोडायला झालेले तर वाकलेले असून त्या खांबावरील दुरुस्ती करताना आपले कर्मचारी सुद्धा जीव मुठीत धरुन काम करतात. असे खांब मोठ्या प्रमाणात रहदारीच्या ठिकाणी म्हणजेच बाजारपेठ, शाळांना मुले जाण्या-येण्याच्या मार्गाच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानीचा धोका संभवतो. हीच अवस्था ग्रामीण भागातही आहे.

या गावातील वीज वाहिन्या या ८० टक्के जुनाट आहेत. तज्ञांच्या मते या विद्युत वाहिन्यांचे आयुष्य संपलेले आहे. तशातच या विद्युत वाहिन्यांना दोन खांबामध्ये एकापेक्षा जास्त जोड असल्याने त्या योग्य प्रमाणात ताणल्या जात नाहीत. त्यामुळे त्या लोंबणाऱ्या स्थितीत आहेत. हंगामी सोसाट्याच्या वाऱ्याने दोन वाहिन्या घासून अगर तुटून जिवीत हानीचा धोका निर्माण होतो. तसेच रहिवाश्यांची वित्त हानीही होते. असे प्रकार यापूर्वी झाल्याच्या घटना असूनही त्यावर उपाययोजना अद्यापही झालेली नाही.

विजवीतरण कंपनी चे याकडे होणारे दुर्लक्ष हे असहनिय आहे. येत्या ४-५ दिवसांत विद्युत वाहिन्या आणि विद्युत खांब बदलण्याचे काम न केल्यास ग्रामस्थांना तिन आंदोलनाचा मार्ग पत्करणे भाग पडेल. अशा वेळेस होऊ घातलेली आचार संहीता लागली आणि आंदोलनामुळे शांतता भंग झाली तर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार रहाल असे लेखी निवेदन भाई हळदीवे यांनी दिले आहे.

error: Content is protected !!