उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजातील वंचित घटकांप्रती जबाबदार नागरिक म्हणून भूमिका पार पाडतील – डाँ.राजन खांडेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “उद्यानविद्या काँलेजचे विद्यार्थी काँलेजसाठी भूषण आहेत. ते आनंदाने कष्ट करतात. श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून संविता आश्रमात विद्यार्थ्यांना येथील बांधवांचे जीवन व समस्या जवळून अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधे समाजातील निराधार वंचिताप्रती संवेदनशीलतेची जाणीव निर्माण होईल आणि ते जबाबदार नागरिक म्हणून आपली भुमिका पार पाडतील.”असे भावपूर्ण उदगार उद्यानविद्या महाविद्यालय चे सहयोगी अधिष्ठाता डाँ.राजन खांडेकर यांनी केले. काँलेजचे संविता आश्रमातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरत मार्गदर्शन करताना काढले.

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे हे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. महाविद्यालयाने आजपर्यंत विविध कार्यक्रमामधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचाच एक भाग म्हणून यंदा सलग दुसऱ्या वर्षी दि.१३ ते १५ मार्च,२०२४ दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पणदूरच्या संविता आश्रमात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.राजन खांडेकर व जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांचे हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस विद्यार्थ्यांनी आश्रमात राहून वयोवृध्द, निराधार,अनाथ बांधवांचे जीवन जवळून पाहिले. बांधवांच्या सेवेत ते आनंदाने सहभागी झाले. आनंदाने त्यांनी श्रमदान केले.

शिबिरातील बौध्दीक सत्रांमधे संदिप परब यांनी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशनद्वारे जीवन आनंद संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर संस्थेचे सचिव अँड.किसन चौरे यांनी सोशल मिडियाच्या आधारे त्यांनी संविता आश्रमातील बांधवांच्या कुटुंब पुनर्मिलन विषयीचे प्रयत्न, अनुभव व प्रक्रीयेविषयी मांडणी केली. मानसोपचार तज्ञ डाँ.रूपेश पाटकर यांनी युवकांचे मानसिक आरोग्य तर चेंदवणकर व सहदेव पाटकर यांनी शेती व मधुमक्षिका पालन विषयी मार्गदर्शन केले. डाँ.राजन खांडेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ.संदीप गुरव व एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गिरीश उईके यांच्या संयोजन व मार्गदर्शनातून शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. विद्यार्थ्यांमधे समाजातील वंचित निराधार घटकांप्रती सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी संविता आश्रमाला भेट देऊन या निराधार, गरजू लोकांच्या वेदनेवर फुंकर घालणे गरजेचे आहे व या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलणे गरजेचे असल्याबाबत प्रा.डाँ.संदिप गुरव यांनी भावना व्यक्त केली.

error: Content is protected !!