22 केसेस आणि रू.20 हजाराचा दंड वसूल—
मोहीम सदैव चालू राहणार– पोलीस व ट्रॅफिक विभागाची ग्वाही !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आंबोली आणि गगनबावडा- वैभववाडी घाट जड वाहनांसाठी बंद केल्या नंतर फोंडाघाट मार्गे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातही रस्ता रुंदीकरणामुळे दुकानापुढे दुचाकी- चारचाकी वाहनांचे पार्किंग प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा हेतूच बारगळला आहे. त्यातच मोकाट जनावरांचा त्रास वाहतुकीला होतो. गेल्या आठवड्यात रुग्णवाहिकेला काही काळ खोळंबून राहावे लागले होते. याची नोंद घेऊन पोलीस आणि ट्राफिक विभागाने सोमवारी -बाजाराच्या दिवशी वाहतूक खोळंब्यास जबाबदार 22 वाहनांवर केसेस दाखल करून, सुमारे 20 हजाराचा दंड वसूल केला…
या मोहिमेत लायसन सोबत नसणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी गाड्या पार्किंग करणे, चार अंकी नंबर नसणे, इशारा तोडणे, अल्पवयीन कडून वाहने चालवणे इत्यादी बाबत केसेस दाखल करण्यात आल्या .त्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. ही मोहीम यापुढे आठवड्यातून अनेकदा राबवुन वाहनधारकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. कित्येक वर्षे फोंडाघाट बाजारपेठेमध्ये हॉकर्स- विक्रेते आणि वाहन चालकामधील बेशिस्त आणि अरेरावी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्यात मोकाट फिरणारी जनावरे हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे रुग्णवाहिका- पादचारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागतो.
या मोहिमेमुळे बाजारपेठेत या बेशिस्तेला आळा बसून, वाहनधारक त्याला सहकार्य करतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मोहिमेमध्ये पोलीस निरीक्षक तडवी यांचे आदेशाने, ट्रॅफिक हवालदार चव्हाण, पीएसआय शेडगे, एएसआय उबाळे, होमगार्ड संकपाळ-सुर्वे यांनी सहभाग घेतला.या मोहिमेचे फोंडावासीय ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.घाटात मोहीम राबवण्या पेक्षा,फक्त बाजाराचेच दिवशी अशा मोहिमा न राबवता वाहतूक खोळंबा होणाऱ्या वेळेला त्याची आवश्यकता जास्त आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.