सुदैवाने जीवितहानी टळली
अठरा प्रवासी किरकोळ जखमी ड्रायव्हरला जबर मार
स्टेरिंग राॅड तुटल्याने अपघात
आचरा (विवेक परब) : आचरा बंदर ते कणकवली पर्यंत जाणारी बस क्र. एम. एच. २० बी. एल. १२०६ ही बस ड्रायव्हर ए. एम. बुटाले वय ४२ रा. घोडगे, हे १८ प्रवाशांना घेऊन कणकवली येथे जाताना श्रावण बाजारपेठ शाळेजवळ बसचे स्टेअरिंग तुटल्याने, बसवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला व अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हरला जबर मार बसला. तर बाकी सर्व प्रवाशांना किरकोळ मार लागला व एका मुलाच्या पायाला तर एकाला छातीला मार लागला.
दुपारी एकच्या दरम्यान कणकवली ला जाणाऱ्या बस क्रमांक १२०६ या बसला श्रावण शाळेसमोर बसचे स्टेरिंग तुटल्याने अपघात झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे ७० टक्के बसेस ह्या जुन्याच व नादुरुस्त आहेत. तरी सुद्धा महामंडळ याकडे लक्ष न देता या बसेस ड्रायव्हरच्या ताब्यात देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत, प्रवासी वाहतूक करत आहेत. याची कोणीही दखल घेत नाहीत. असे हे वारंवार प्रकार घडत आहेत. याला जबाबदार सर्वस्वी महामंडळ असून एसटीचे कर्मचारी नाहक गोवले जात आहेत. यावर विचार व्हावा अशी मागणी येथील उपस्थित ग्रामस्थांमधून व प्रवासी वर्गाकडून होत होती.
अपघाताची बातमी कळतात श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे तसेच माजी सरपंच प्रशांत परब, गणेश बाईत, संतोष बाईत, ओमकार बावसकर, मंगेश यादव, भाऊ राऊत, स्वप्निल परब, स्वप्निल पवार व कार्यकर्ते धावून जाऊन या जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी कणकवली येथे पाठवण्यात आले. यावेळी श्रावणच्या अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.
यावेळी आचरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जाधव व सहकारी आणि एस. टी डेपो मालवणचे डेपोमॅनेजर सचेतन बोवलेकर व कणकवलीचे अजय गायकवाड व अधिकारी उपस्थित होते. अधिकारी उपस्थित राहुन सहकार्य केले.















