दि 8 जुलै ते 7 ऑगस्ट कालावधीत जिल्हावासियांनी सहभाग व्हा – मकरंद देशमुख
ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्य डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. त्यासाठी मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे या विविध विषयाच्या अनुषंगाने 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी “स्वच्छतेचे रंग दोन ओला हिरवा व सुका निळा” या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे.
गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ५ संवादकाची निवड करण्यात आली असून हे संवादक गृहभेटी करुन स्वच्छता संदेश देत आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक यांचा समावेश आहे.
८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्याबाबत तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदी बाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहेत. भेटी दरम्यान शासनाच्या गुगुल लिंकवर त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्यात येणार आहे.
यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रति ग्रामपंचायत पाच या प्रमाणे संवादकांची निवड केली आहे. तर तालुक्यातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावणी करणार आहेत. दर आठवडयाला या अभियानाचा जिल्हास्तरावरुन आढावा घेण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा व्यवस्थापनाकरीता ग्रामस्थानी सक्रीय सहभाग घेवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात 2155 संवादक
जिल्ह्यात 431 ग्रामपंचायती असून, 2155 संवादकांच्या माध्यमातुन अभियान कालावधित 2 लाख 37 हजार 50 गृहभेटी करण्याबाबत तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. संवादक स्वच्छतेच्या दोन रंगाबाबत मार्गदर्शन करतील. ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या घरी दोन कुंड्या ठेवाव्यात. ओला हिरवा व सुका निळा या प्रमाणे कचऱ्याची विल्हेवाट लावावी.