नवीन आंबेरी पुलावरून एसटी वाहतूक केली सुरु
माजी जि.प.सदस्य राजू कविटकर यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार
मालवण (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे आंबेरी येथील जुन्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. एसटी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. मात्र याच ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या नवीन पुलावरून अद्याप पर्यंत वाहतूक सुरु न झाल्याने पाहणी करण्यासाठी आलेले आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत दोन दिवसात पुलावरून वाहतूक सुरु न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. आ. वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबेरी येथील नवीन पुलावरून वाहतूक सुरु करण्याचे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे. आज प्रत्यक्षात या पुलावरून एसटी वाहतूक सुरु झाली. त्याबद्दल माजी जि.प.सदस्य राजू कविटकर यांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले तसेच पुलाच्या ऍप्रोच रोडचे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना राजू कविटकर यांनी दिल्या आहेत.
आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलासाठी बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून पुलाचे काम पूर्ण करून घेतले. मात्र त्यानंतर दोन वर्षात सत्तांतर होऊन सत्तेत आलेल्या भाजपने पुलाच्या ऍप्रोच रोडसाठी आवश्यक असलेला ५० लाखाचा निधी दिला नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे पालकमंत्री आणि सा. बा.विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली.
त्यामुळे याचा फटका माणगाव खोऱ्यातील लोकांना बसला. येणाऱ्या २ दिवसात ऍप्रोच रोडचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरु न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा आ. वैभव नाईक यांनी सोमवारी दिला होता. त्यामुळे आता आंबेरी पुलावरून वाहतुकीचा प्रश्न सुटून माणगाव खोऱ्यातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी वाहतुकीची गैरसोय दूर झाली आहे.
यावेळी माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, विभाग संघटक कौशल्य जोशी, उपसरपंच बापू बागवे वसोली सरपंच अजीत परब, माणगाव उपविभाग प्रमुख एकनाथ धुरी, माणगाव ग्रामपंचायत सदस्य अवधुत गायचोर आदी उपस्थित होते.