मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील चर्चेगट, सीएसएमटी, भायखाळा, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला, दादर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरातही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवांवर झाला आहे. मुंबईतील मध्य रेल्वेवरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. तर पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहे. त्यासोबतच हार्बर मार्गावरील सर्व लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन कोलमडल्यामुळे कामासाठी निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे.

तर दुसरीकडे आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोलनाक्याच्या पुढे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. एकीकडे पडणारा पाऊस, सिग्नल यंत्रणा, टोल नाका आणि रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावलेली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!