मसुरे (प्रतिनिधी) : अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग म्हणजेच जुनी न्यू इंग्लिश स्कूल (1973) देवबाग च्या मार्च 1993 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच कडून प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी रुपये 20000/- इतकी आर्थिक मदत करण्यात आली. सदरची आर्थिक मदत ही संस्था सदस्य निलेश सामंत आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मार्च 1993 च्या इयत्ता दहावी माजी विद्यार्थी बॅच मधील प्रवीण घाटवळ, महेंद्र गोवेकर, राजन मोरजकर, साधना केळुसकर (वाईरकर), सरीता मांजरेकर (धोपावकर ) हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी संस्था सदस्य कृष्णा मालंडकर व श्रीतारी या उपस्थित होत्या, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर देखील उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका खोबरेकर यांनी बोलताना या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचे आभार मानले व सदरची मदत ही शैक्षणिक उपक्रमात खर्च होईल याची ग्वाही दिली. तसेच वेळोवेळी असेच सहकार्य करण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच इयत्ता १० वी मार्च 1993 च्या बॅच कडून प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांना व संस्था सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन व अल्पोपहाराने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे लिपिक रुपेश खोबरेकर यांनी केले.
