सरपंच आनंद ठाकूर यांचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथे में २०२४ मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ न मिळाल्यास २१ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकुर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात ठाकुर यांनी म्हटले आहे, हरकुळ बुद्रुक येथे १६ मे रोजी झालेल्या चक्रीवादळासह पावसाने अनेक घरे, गोठे तसेच इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामपंचायतीकडून तसे पत्र आपल्या कार्यालयाकडे तात्काळ सादर केले आहे. तरीही अद्याप या नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत मिळालेली नाही. या नुकसानीची आपण प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची रक्कम तात्काळ मिळण्याची कार्यवाही शासनस्तरावर पूर्ण करावी अन्यथा नुकसानीच्या रकमेसाठी आम्ही नुकसानग्रस्त ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर २१ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन छेडणार असल्याचे ठाकुर यांनी म्हटले आहे.