माजी विद्यार्थ्यांसह दानशूर व्यक्तींचे दातृत्व
चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील पेंडुर माध्यमिक शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याला माजी विद्यार्थी, शिक्षकांचे नातेवाईक, दानशूर व्यक्ती, चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्याकडून मिळालेल्या देणगी रकमेतून ७७ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम नुकताच पार पडला.
ग्रामीण भागात आजही बऱ्याच सामान्य कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. यामुळे होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश विकत घेणे कठीण जाते. यासाठी संस्था आणि शाळेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर जवळपास ८० हजार रुपये रक्कम जमा झाली. त्यातील काही रकमेतून ३१ मुली आणि ४६ मुलगे यांच्यासाठी गणवेश खरेदी करण्यात आले. शिक्षक – पालक सभेच्या निमित्ताने त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे यांनी पाच हजार रुपयाची देणगी मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी बोलताना ते म्हणाले संस्था जेव्हा शाळा चालवत असते त्यावेळी इमारत दुरुस्ती, क्रीडांगण, आरोग्य विषयक सुविधा यासारख्या गोष्टीवर विशेष लक्ष दिले जाते. या कार्यात राजकीय, सामाजिक आणि दानशूर व्यक्तींकडून नेहमीच सहकार्य मिळते. शाळेत मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एका माजी विद्यार्थ्याने केलेली मदत शिवाय वेळोवेळी मदतीसाठी तत्पर असणारे माजी विद्यार्थी सीताराम गावडे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घन:श्याम राणे, मुख्याध्यापक सुरेश तावडे, संचालक प्रदीप सावंत, सुभाष सावंत यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संगम चव्हाण यांनी केले. पुढील वर्षीही मुलांना गणवेश पुढीलवर्षी शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांनाही गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. त्याची तरतूद करताना मदतीतून शिल्लक राहिलेली रक्कम मुख्याध्यापकांकडे देण्यात आली. यावेळी संस्था, शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि पालकांच्यावतीने शाळा, विद्यार्थ्यासाठी आर्थिक सहकार्य उभे करणाऱ्या माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्तींचे आभार मानण्यात आले.