डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त कणकवलीत निर्भय मॉर्निंग वॉक

अंनिस, अखंड लोकमंच आणि परिवर्तनवादी संघटनांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कणकवली आणि अखंड लोकमंच तसेच इतर परिवर्तनवादी संघटना, चळवळी यांच्या वतीने आज २० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता कणकवली बाजारपेठ येथील पटकीदेवी मंदिर ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवली शहरातील विवेकाचा विचार जाणणाऱ्या आणि जपणाऱ्या अनेक व्यक्तींनी यात सहभागी होत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती जागवल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या परिवर्तनवादी विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशभरात अंधश्रद्धेविरुद्ध मोठा लढा उभारला. अंनिसच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. आज या निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून डॉ. दाभोळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि समाजात भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना निर्भयपणे सामोरे जाण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.

कणकवली बाजारपेठ येथील पटकीदेवी मंदिराकडून या निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात करण्यात आली आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. यामध्ये परिवर्तनवादी विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच समारोपाच्या वेळी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ऍड. मनोज रावराणे, डॉ. सतीश पवार, डॉ. चंद्रकांत पुरळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, इंद्रजीत खांबे, संतोष कांबळी, डॉ.आशिष नाईक, ऋषिकेश कोरडे, विनायक सापळे, अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक आणि इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!