आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात केळूस दशक्रोशी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी ) : ग्रामस्थांचा विरोध झुगारुन आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सहकार्य करीत असल्याचा आरोप केळूस दशक्रोशी ग्रामस्थांनी केला असुन या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

आकाश फिश मिल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी केळुस सरपंच योगेश शेटे, आनंद गावडे, गोविंद केळुस्कर,सुनील पाटकर, यांच्या नेतृत्वाखाली केळुस पंचक्रोषितील ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
वेंगुर्ला तालुक्यातील केळूस येथील आकाश फिशमिल दुषीत पाणी येथील समुद्रात सोडत असल्याने पर्यावरणाची हानी होत असून प्रदुषण वाढले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या साठी तेथील ग्रामस्थानी या विरोधात ऑगस्ट महिन्यात आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या निर्णयानुसार कंपनीने त्रुटींची पुर्तता केल्याची खात्री महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांसह संयुक्तरीत्या करावी आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले होते. दरम्यान झालेल्या पाहणीत प्रदुषण मंडळाच्या सूचनांचे पालन कंपनीकडून झाले नसल्याची बाब समोर आली. आणि असे असताना १३ सप्टेंबर रोजी प्रदूषण मडळाने पाईप लाईनने समुद्रात पाणी सोडण्यास कंपनीला परवानगी दिली असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या तक्रारीनुसार १३ ऑगस्ट रोजी या कंपनीच्या उत्पादनाला निर्बध घालण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबर रोजी पुन्हा कंपनी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, यामुळे मच्छिमार, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात नाराजी असून सागरी जैवविविधता धोक्यात येणार असल्याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
पाईपलाईन जोडणीला मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळांचा हा आदेश रद्द करावा, कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुषीत पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा कंपनीनेच पुनर्वापर करावा, कंपनीतील घनकचरा कंपनीच्या बाहेर सोडण्यावर निर्बध लादण्यात यावेत त्यांची कंपनीतच विव्हेवाट लावण्यात यावी. दुर्गंधीयुक्त वासावर नियंत्रण करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कंपनीचे दूषित पाणी समुद्रात अथवा उघड्यावर सोडू नये. आदी मागण्यासाठी आज
केळूस, कालवी, म्हापण, खवणे, मळई, आंदुर्ले,पाट येथील शेकडो ग्रामस्थ, मच्छिमार, यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
तर यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत नाहीत. तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!